“मराठी दैनिक पोलिस महानगरच्या बातमीचा परिणाम : देवनार बूचडखान्यात स्वच्छतेला मिळाली गती!”
रवि निषाद / मुंबई
मुंबई : देवनार बूचडखान्यातील अस्वच्छतेच्या आणि मृत जनावरांच्या दुर्गंधीच्या तक्रारींवर मराठी दैनिक पोलिस महानगरने प्रखरपणे प्रकाश टाकल्याने प्रशासनाला अखेर जाग येत, तत्काळ कारवाई झाली आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महाव्यवस्थापक श्री. कलीम पाशा पठान यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधत संपूर्ण बूचडखाना परिसर तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश दिले.
पोलिस महानगरच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री. पठान म्हणाले, “देवनार पशुवधगृहातील दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या तक्रारी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही तत्काळ कारवाई केली. संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन संपूर्ण परिसरात साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले.” यासंदर्भातील छायाचित्रे देखील श्री. पठान यांनी प्रतिनिधीला पाठवली आहेत.
ते पुढे म्हणाले की, “जेव्हा एखादा प्राणी मृतावस्थेत सापडतो, तेव्हा त्यास २४ तास स्थलावर ठेवण्याची नियमबद्ध प्रक्रिया आहे. त्यानंतरच संबंधित यंत्रणेला कळवून मृत जनावराचे उचल व विल्हेवाट लावली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने तात्पुरती दुर्गंधी निर्माण होऊ शकते. मात्र, आम्ही नियमांचे पालन करत आहोत आणि स्वच्छतेबाबतही तडजोड नाही.”
देवनार बूचडखान्यातील व्यापारी, गवळण, दलाल वर्ग यांमध्ये याआधी भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, पोलिस महानगरच्या बातमीनंतर प्रशासनाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की, जबाबदार पत्रकारिता केवळ समस्येकडे लक्ष वेधत नाही तर प्रशासनालाही कृती करण्यास भाग पाडते. मराठी दैनिक पोलिस महानगरने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत एक सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे.