तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्या भोंदू ज्योतिषाला सहकार नगर पोलीसांनी घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर भोंदू बाबांचे कारनामे समोर येत आहेत. अशातच पुण्यात आणखी एका बाबाचं संतापजनक कृत्य समोर आलं असून पोलिसांनी त्या बाबावरती तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न, विनयभंग करणार्या ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे. तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा प्रयत्न या बाबाने केला आहे. पुण्यातील संतापजनक घटनेनंतर ज्योतिषाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पत्रिका पाहून भविष्य सांगण्याचा दावा करणार्या एका भोंदू ज्योतिषाने हे कृत्य केलं आहे, पुण्यातील धनकवडी भागात ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश लक्ष्मण राजगुरु असे अटक केलेल्या या ज्योतिषाचे नाव आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मैत्रिणीने या ज्योतिषी पत्रिका पाहून भविष्य सांगतो, त्याच्याकडे जाऊन ये, असे सांगितले होते. फिर्यादी यांनी त्यांच्या भावाची पत्रिका या ज्योतिषाकडे १२ जुलै २०२५ रोजी घेऊन पोहचल्या. पत्रिका पाहिल्यानंतर ज्योतिषाने “तुमच्या भावाला एक वनस्पती द्यायची ती मागवून घेतल्यावर तुम्ही या,” असं सांगितलं होतं.
१८ जुलै रोजी ज्योतिषाने फिर्यादी यांना वनस्पती घ्यायला उद्या या, असं सांगितलं. १९ जुलै रोजी जेव्हा फिर्यादी त्यांच्या धनकवडी येथील कार्यालयात गेल्या तेव्हा ज्योतिषाने “आणलेला वनस्पती तुमच्या डोक्यावर वस्तू ठेऊन मंत्र म्हणावे लागतील” असं सांगितलं. फिर्यादी यांना संशय आल्याने त्या ठिकाणाहून निघाल्या. दरम्यान, अचानक अखिलेश राजगुरु या भोंदु ज्योतिषाने त्यांना मिठी मारली व त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी याबाबतची माहिती भावाला फोन करुन कळवली आणि पोलिसात तक्रार दिली. तक्रार देताच सहकारनगर पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची माहिती देताना सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर छापा टाकला. त्याला अटक केली आहे. त्याच्या कार्यालयाची पाहणी केल्यावर त्याने आणखी काहीबाबत असे कृत्य केली असण्याची शक्यता वाटते.