किरकोळ भांडणामुळे दारूच्या नशेत भावानेच केला भावाचा खून; पोलिसांनी आरोपी भावाला केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उन्हवरे गावी एका भावानेच भावाचा खून केला. किरकोळ भांडणामुळे आणि दारूच्या नशेत हे कृत्य घडले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रवींद्र तांबे याला अटक केली आहे. विनोद गणपत तांबे (३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा भाऊ रवींद्र तांबे (४२) याने हे कृत्य केले. खुनाची माहितीमिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी रवींद्रला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दापोली तालुक्यातील उन्हवरे गावातील बौद्ध वाडीत घडली. रवींद्र, विनोद आणि त्यांची आई संगीता (७५) येथे राहतात. विनोद मोलमजुरी करायचा, तर आई घरकाम करते. रवींद्र कोणताही कामधंदा करत नाही. दोघांनाही दारूचे व्यसन आहे. दारुच्या व्यसनापायी कामधंदा करत नसल्याने रवींद्रची पत्नी १२ वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली.
पोलिसांनी सांगितले की, “या दोन्ही भावांमध्ये नेहमी किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि भांडण होत होते.” १९ जुलै रोजी त्यांच्या भावकीची मीटिंग होती. त्यामध्ये विनोदने रवींद्रला अपशब्द बोलले. त्यामुळे रवींद्रच्या मनात राग होता. रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला. रात्री पावणे बाराच्या सुमारास रवींद्रने विनोदच्या डोक्यात फरशी मारली. त्यामुळे विनोद गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश तोरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावले. रवींद्रवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली ते पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत,” असे पोलिसांनी सांगितले.