भिवंडीत १६ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्याऱ्या रिक्षाचालकास अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश
योगेश पांडे / वार्ताहर
भिवंडी – अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाच्या प्रयत्नातील रिक्षाचालकास ताब्यात घेऊन बेड्या ठोकण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. असगर अली शाबीर अली शेख (३५) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फातिमा नगर परिसरात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन तरुणी बुधवार ९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शाळेत जाण्यासाठी रिक्षाने निघाली असता रिक्षा रामनगर येथील पाण्याच्या टाकी जवळील शाळेजवळ आली असता विद्यार्थिनीने चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितले. विद्यार्थिनीने रिक्षा चालकाला थांबण्यास सांगितल्यानंतरही तो थांबला नाही आणि पुढे घेऊन जात त्याने मुलीशी जबरदस्ती केली. त्यावेळी प्रसंगावधान राखत विद्यार्थिनीने स्कूल बॅगमधील कंपास पेटीमध्ये असलेले कर्कटकने रिक्षावाल्यास मारून शेजारील बसलेल्या त्याच्या साथीदारास धक्का मारून रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेत विद्यार्थिनी शाळेत पोहचली. त्यानंतर घरी आल्यावर तिने आपल्यासोबत घडलेला प्रसंग आई वडिलांना सांगितला.
शुक्रवारी विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर अज्ञात रिक्षाचालक व त्याचा साथीदार अशा दोघांविरोधात भान्यासं कलम १३७ (२), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून विद्यार्थिनीने दिलेल्या वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला होता. त्यातच गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी रविवारी फातिमानगर येथे सापळा रचून रिक्षा चालकास ताब्यात घेऊन अटक केली असून रिक्षा चालक त्याच परिसरात राहत असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान रिक्षा चालकास सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. तर रिक्षा चालकाने सदर अपहरणाचा प्रयत्न का व कशासाठी केला ? याबाबत पोलिस तपास करत आहेत. तसेच त्याच्या साथीदाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले. विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत स्वत:ची सुटका करून घेतली. पोलीस आता या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी अजून काही खुलासे होऊ शकतात? हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.