रुग्णांच्या आरोग्याशी खेळ, वसई विरार पालिकेच्या रुग्णालयांना बनावट औषधांचा पुरवठा
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसई विरार शहर पालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सातिवली येथील माता बाळ संगोपन रुग्णालयातील औषधांची तपासणी केली असता बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा होत असल्याचे उघड झालं आहे. बनावट औषधांच्या पुरवठ्याचा एक मोठा घोटाळा असून यामध्ये आंतरराज्यातील रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाने व्यक्त केली असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात बहुजन विकास आघाडीचा मेडिकल विभाग पालघर जिल्हा सचिव अनिस शेख याच्यासह एकूण सहा पालिकेला औषध गोळ्या पुरवठा करणाऱ्या कंपनी आणि त्यांच्या मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बनावट औषध गोळ्या पुरवठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय शैलेंद्र चौधरी हा दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या नागपूरच्या तुरुंगात असूनही तो हे रॅकेट चालवतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बनावट औषधं पुरवणाऱ्या कंपन्यानविरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पालघरच्या अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात एक भयंकर मोठा मेडिकल स्कॅम उघडकीस आला आहे. या औषध घोटाळ्याची पाळेमुळे देशभर पसरली असल्याची भीती या प्रकरणातून व्यक्त केली जात आहे. वसई विरार शहर महानगर पालिकेच्या सातिवली येथील माता बाळ संगोपन रुग्णालयातील औषधांची तपासणीवेळी येथील काही औषधं बनावट असल्याचे उघड झालं. महत्वाचे म्हणजे ही औषधं पुरवठा करण्याचे कंत्राट हे अनिस अश्रफ शेख मे. प्रणीक एन्टरप्राईजेस याचे असून तो, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पदाधिकारी आणि पालघर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. सध्या दुबईत असल्याची माहिती मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात कंत्राटदार मे. प्रणीक एन्टरप्राईजेसच्या अनिस शेख याने वसई पश्चिमेच्या मे. अमर एजन्सीकडून औषधांची खरेदी केली होती, तर अमर एजन्सीला वसई पूर्वच्या सातिवली येथील श्याम फार्मा द्वारे पुरवठा झाला आहे. तर, शाम फार्माला बाजूलाच असलेल्या गणेश फार्मा ॲण्ड सर्जिकल एलएलपीकडून पुरवठा झाला होता. तर गणेश फार्मा ला, भिवंडीच्या में एक्टीवेन्टीज बायोटेक प्रा.ली. ने पुरवठा केलाय. तो मुख्य मास्टर माईंड विजय शैलेद्र चौधरी याच्या मीरा रोड येथील मे. कॅबीज जनरीक हाउसकडून. विशेष म्हणजे या बनावट औषध गोळ्या पुरवठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय शैलेंद्र चौधरी हा अशाच दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या नागपूरच्या तुरुंगात असूनही तो हे रॅकेट चालवतो.