आपल्या नवजात मुलीला बास्केटमध्ये ठेवून फुटपाथवर टाकून देणाऱ्या दोघांना अवघ्या २४ तासांत अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पनवेल – पनवेल शहरातील तक्का परिसरात २८ जून रोजी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पनवेल पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी आपल्या नवजात मुलीला बास्केटमध्ये ठेवून फुटपाथवर टाकून दिल्याची कबुली दिली असून, ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आली आहे. घटना २८ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली. पनवेलमधील तक्का परिसरात एका झाडाच्या खाली ठेवलेल्या बास्केटमध्ये नागरिकांना नवजात मुलगी दिसली. नागरिकांनी तत्काळ पनवेल पोलिसांना माहिती दिली आणि बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासोबत एक चिठ्ठीही आढळून आली होती, ज्यामध्ये “आम्ही मनापासून माफी मागतो. आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या बाळासाठी आम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काहीही करू शकत नाही. त्यामुळे यामध्ये कोणालाही गुंतवू नका. आम्ही जे सहन करत आहोत, ते बाळाच्या नशिबी येऊ नये, हीच इच्छा. तिची काळजी घ्या. एक दिवस आम्ही तिला परत घेऊ.” असा माफीनामा लिहला होता.
पनवेल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तात्काळ तपास सुरु करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका बुर्खाधारी महिलेला घटनास्थळी बाळ सोडून जाताना पाहण्यात आले. पोलिसांनी तपास अधिक गतीने राबवत महिलेसह तिच्या पुरुष साथीदाराला शोधून काढले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत समोर आले की, या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या संबंधातूनच हे मूल जन्मास आले. मात्र, सामाजिक आणि कौटुंबिक दबाव तसेच आर्थिक अडचणीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कबूल केले. पनवेल पोलिसांनी या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बाळ सध्या रुग्णालयात सुरक्षित असून तिच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे. पोलीस दोघांची सखोल चौकशी करत आहेत.