जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याण परीमंडळात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त (२६ जून २०२५) ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) संजय जाधव, पोलीस उपायुक्त परीमंडळ ०३, अतुल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, कल्याणजी घेटे व सुहास हेमाडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, परीमंडळ ०३, कल्याण पोलीस विभागात २६ व २७ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेंतर्गत महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रॅली, प्रभातफेरी, पथनाट्य, व्याख्याने, कार्यशाळा, निबंध व चित्रकला स्पर्धा, तसेच ई-पोस्टर स्पर्धा बक्षीस समारंभ यांचा समावेश आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी बॅनर, पत्रके आणि होर्डिंग्ज लावून व्यापक जनजागृती केली जात आहे.
विशेषतः २६ जून रोजी खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील बिर्ला कॉलेज येथे होणाऱ्या कार्यक्रमास मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची रॅली, पथनाट्य सादरीकरण व अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन करण्यात येईल.
या अभियानाअंतर्गत आयोजित काही महत्त्वाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
🔹 अचिव्हर्स कॉलेज, कल्याण पश्चिम (२६ जून, १२.३० ते १६.३०): अंमली पदार्थ विरोधी परिसंवाद व बक्षीस वितरण.
🔹 कुतन विद्यालय, कर्णिक रोड (२६ जून, १०.०० ते १०.३०): शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी.
🔹 पारनाका ते गांधी चौक मार्गावर (२६ जून, १०.०० ते १२.००): अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली.
🔹 डोंबिवलीतील विविध महाविद्यालयात (२५ ते २७ जून): व्याख्याने, कार्यशाळा, प्रभातफेरी, पथनाट्य व जनजागृती उपक्रम.
🔹 नशाबंदी मंडळामार्फत (पेंढारकर कॉलेज चौक, २६ जून): पथनाट्य सादरीकरण.
कल्याण डोंबिवली परिसरातील शाळा-महाविद्यालयांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॅशिंग पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे.