बोरीवलीतील १३ किलो सोन्याची चोरी, केवळ ७२ तासांत ११ कोटींचं सोनं हस्तगत; गुजरातमधून ३ आरोपी जेरबंद

Spread the love

बोरीवलीतील १३ किलो सोन्याची चोरी, केवळ ७२ तासांत ११ कोटींचं सोनं हस्तगत; गुजरातमधून ३ आरोपी जेरबंद

मुंबई – बोरीवली (पश्चिम) येथील नामांकित सराफ व्यवसायिकाच्या फ्लॅटवरून तब्बल १३ किलो सोनं चोरणाऱ्या सहाय्यकाने विश्वासघात करत पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांच्या जलद कारवाईत केवळ ७२ तासांत तीन आरोपींना गुजरातमधून अटक करून सुमारे ११ कोटींचं सोनं हस्तगत करण्यात आलं. ही घटना विक्रीहून परतलेल्या विक्रेत्यांनी सोनं फ्लॅटवर आणल्यानंतर घडली. आरोपी जिग्नेश नाथाभाई कुछडिया (वय १९) याने फ्लॅटवर पोहोचताच सोन्याने भरलेल्या दोन सँक बॅगा घेऊन पलायन केलं. त्याच्या विरोधात बोरीवली पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे राजकोट, पोरबंदर, जामनगर आणि जुनागड भागात शोधमोहीम राबवण्यात आली. तपास पथकाने शेवटी मुख्य आरोपी नाथाभाई हरदासभाई कुछडिया (वय ५०) याला गुजरातच्या जंगलात लपलेले असताना अटक केली. त्याच्याकडून ११ किलोपेक्षा अधिक सोनं आणि एक महिंद्रा थार गाडी जप्त करण्यात आली.

जप्तीचा तपशील:

सोनं: ११,१०७.०७ ग्रॅम – ₹११,०१,७१,०२७/-

महिंद्रा थार एसयूवी: रुपये २०,००,०००/-

अटक आरोपींची नावे:

१. जिग्नेश नाथाभाई कुछडिया (वय १९)

२. यश जिवाभाई ओडेदरा (वय २१)

३. नाथाभाई हरदासभाई कुछडिया (वय ५०)

सर्व आरोपींना २४ जून २०२५ रोजी बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली, सहा. पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मिना, तसेच परीमंडळ ११ चे पोउआ आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

तपासासाठी कार्यरत विशेष पथकात पो.नि. अतुल आव्हाड, सपो.नि. बाबुलाल शिंदे, गणेश तोरगल, गणेश तारगे, पो.उप.नि. निलेश पाटील, संदीप गोरडे, वसिम शेख, मंगेश किरपेकर, पो.ह. साखरे, परीट, साळुंखे, देवकर आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. या पथकाने अत्यंत तांत्रिक बारकावे व मानवी बुद्धीचा वापर करत आंतरराज्यीय आरोपींचा पाठलाग करत सर्व १३ किलोपैकी ११ किलोहून अधिक सोनं हस्तगत केलं असून, उर्वरित सोनं हस्तगत करण्यासाठी तपास सुरु आहे. ही कारवाई म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon