लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, व्हिडिओ व्हायरल, नागरिक संतप्त

Spread the love

लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी; रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, व्हिडिओ व्हायरल, नागरिक संतप्त

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – एकीकडे बुलेट ट्रेन, मेट्रोचे जाळे विणले जात असताना सरकारचे लोकल सेवेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. लोकल ट्रेनमधील गर्दी दिवसेंदिवस वाढतच असून त्यांच्या सोईसाठी सरकारकडून काहीच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे कधी गर्दीवरुन तर कधी उभे राहण्याच्या जागेवरुन वाद होतात. असाच वाद विरार लोकल रेल्वेमध्ये झाला असून दोन महिलांनी एकमेकांना मारहाण केली. ही मारहाण इतकी टोकाला गेली की त्यामुळे एका महिलेचं डोकं फुटून ती रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आलं. १७ जूनच्या संध्याकाळची ही घटना असल्याचं समोर आलं आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार लोकलमध्ये ही घटना घडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जागेच्या वादावरुन दोन महिला एकमेकींना भिडल्या. ही मारहाण इतक्या टोकाला गेली की त्यामुळे एका महिलेचे डोके फुटले आणि ती रक्तबंबाळ झाली.

ही घटना विरार लोकलमधील मिरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान १७ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसन मारहाणीमध्ये झाले. प्रवाशांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकाराची दखल घेतली जात आहे. सायंकाळी ७.३२ वाजता ही लोकल भाईंदर स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान जागेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले. या घटनेबाबत दोघींपैकी कुणीही तक्रार दाखल न केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही अशी माहिती वसई लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे.

दरम्यान, लोकलमध्ये महिला प्रवाशांमध्ये होत असलेले वाद, त्यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटना चिंताजनक आहेत. रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी महिला प्रवासी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon