घाटकोपरमध्ये मोठी कारवाई : २.०३ कोटींचा ‘मेफेड्रॉन’ जप्त, तिघांना अटक
मुंबई – मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने घाटकोपर आणि अंधेरी परिसरात कारवाई करत मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण १.२८ किलो मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे बाजारमूल्य रु. २.०३ कोटी इतकी आहे. विशेष गस्तीदरम्यान घाटकोपर बस स्थानकाजवळ दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अनुक्रमे २५७ ग्रॅम आणि १५६ ग्रॅम एम.डी. जप्त झाले. पुढील तपासात या दोघांचा साथीदार अंधेरी पश्चिम येथे आढळून आला. त्याच्याकडून ६०५ ग्रॅम मेफेड्रॉन हस्तगत करण्यात आले.
तिघेही आरोपी घाटकोपर व अंधेरी भागात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली, सह पोलीस आयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर, तसेच पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन
जर कुणाकडे अमली पदार्थ विक्री किंवा साठवणुकीविषयी माहिती असेल, तर ती ९८१९१११२२२ या इन्फोलाईनवर किंवा ‘मानस’ हेल्पलाइन १९३३ वर कळवावी. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाईल.