शहापूरच्या मुलीची गरुड झेप!
आरटीओ अधिकारी पदावर असलेल्या सुजाता रामचंद्र मडके यांचा थेट ‘इस्रो’ मध्ये शास्त्रज्ञ म्हणून प्रवेश.
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शिरगाव या लहानशा खेड्यातून येणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीने इतिहास रचला आहे. आरटीओ अधिकारी पदावर असलेल्या सुजाता रामचंद्र मडके यांनी नोकरी सोडून थेट इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून प्रवेश केला आहे. ठाणे जिल्ह्यातून इस्रोमध्ये निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. सुजाता यांचा शैक्षणिक प्रवास जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झाला. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर त्यांनी हायस्कूलचे शिक्षण खाडे विद्यालयात पूर्ण केले. दहावीनंतर अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ होण्याची त्यांची इच्छा होती. बिर्ला महाविद्यालयात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथून त्यांनी बी टेक. (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन परिषदमध्ये असिस्टंट इंजिनीअर पदावर नियुक्ती मिळाली. त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन परिवहन विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून नोकरी पत्करली. पण त्यांचे स्वप्न होते ‘इस्रो’ मध्ये जाण्याचे.
आरटीओमध्ये काम करत असतानाही सुजाता यांनी रात्रीच्या वेळेस अभ्यास सुरू ठेवला.इस्रोच्या सायंटिस्ट पदासाठीची तयारी करताना, त्यांनी अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. घरातल्या आर्थिक अडचणी असूनही सुजाता यांच्या आईवडिलांनीही त्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. त्यांच्या घरातील अभ्यासाची अनेक जुने पुस्तके आहेत, जे तिच्या मेहनतीची साक्ष देतात. ‘आज ती केवळ इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून निवडली गेली नाही, तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलींना एक प्रेरणा ठरली आहे. तिचा प्रवास हे दाखवून देतो की, चिकाटी, स्वप्न आणि परिश्रम यांच्या जोरावर कोणतंही ध्येय गाठत्ता येते,’ अशा भावना तिचे वडील रामचंद्र मडके यांनी व्यक्त केले.