एक किलो सोनं आणि रोकड लंपास करणारे चोरटे गजाआड; मनमाड पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – मनमाड शहरातील डमरे कॉलनीमध्ये घरफोडी करून तब्बल १,२०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला मनमाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात तीघा सराईत गुन्हेगारांना गजाआड करण्यात आलं असून त्यांच्याकडून सुमारे रुपये १.०५ कोटींचे सोनं हस्तगत करण्यात आलं आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चोरट्यांनी ॲल्युमिनियम व्यावसायिक मुर्तजा रस्सीवाला यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला आणि कपाट फोडून दागिने व रोकड लंपास केली होती. घटनेनंतर ११ जून रोजी मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, आणि फॉरेन्सिक पथकाने तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर व मनमाड ठाण्याचे निरीक्षक विजय कारे यांच्या तपासात संजय गायकवाड, राकेश संसारे (दोघेही आनंदवाडी, मनमाड), आणि राजेश शर्मा ऊर्फ भैया (नाशिक) या सराईतांना अटक करण्यात आली. या टोळीने घरफोडीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून १ किलो ५५.८५० ग्रॅम सोनं, रोकड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी:
राजेश शर्मावर घरफोडी, चोरी, दरोड्याचे २७ गुन्हे दाखल आहेत. गायकवाडवर ८ गुन्हे, तर संसारेवर ४ गुन्हे नोंद आहेत. या टोळीचा तपास अधिक खोलवर सुरू असून उर्वरित मुद्देमाल मिळवण्यासाठी पोलीस अधिक कार्यरत आहेत.