बुधवार पेठेतील कुंटणखान्याच्या मालकिणीला मेफेड्रोन विक्रीप्रकरणी अटक

Spread the love

बुधवार पेठेतील कुंटणखान्याच्या मालकिणीला मेफेड्रोन विक्रीप्रकरणी अटक

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे – शहराच्या मध्यवर्ती बुधवार पेठ परिसरात धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. वेश्यावस्तीतील एका कुंटणखान्याची मालकिण मेफेड्रोन (एमडी) या अत्यंत घातक अमली पदार्थाच्या विक्रीत सक्रिय असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ज्योती सुनील यादव उर्फ कट्टीमणी (वय ५०, रा. कात्रज) असे आहे. ज्योती यादव ही बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये कुंटणखाना चालवत होती. ती केवळ व्यवसाय चालवत नव्हती, तर तिने वस्तीतील महिलांना आणि तिथे येणाऱ्या युवकांना अमली पदार्थ पुरवण्याचे जाळे उभे केले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी अटक करण्यात आलेला शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४), जो ज्योती यादवचा भाऊ आहे, त्याच्या चौकशीतूनच या प्रकरणाचा उलगडा झाला. शरणप्पाला दोन दिवसांपूर्वी मेफेड्रोन विक्रीप्रकरणी अटक झाली होती. त्याच्या बड्या पुरवठादाराचा शोध घेत असताना पोलिसांना आपल्या बहिणीवर संशय गेला आणि पुढे तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली.

सदर कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, तसेच सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच चेतन गायकवाड, संदीप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, नीलम पाटील, दिशा खेवलकर यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांकडून आता पुढील तपास सुरू असून, या नेटवर्कचा विस्तार व आणखी आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात अमली पदार्थ विक्री थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon