गुरांची तस्करी करणाऱ्याची मुजोरी; चक्क गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न
अकोला पोलिसांच्या मदतीने तब्बल १०० किलोमीटरपर्यंत पाठलाग करून अखेर आरोपीला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
जळगाव – स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतानी आरोपीकडून चारचाकी रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील बालंबाल बचावले असून त्यांना बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बरगड्यांना दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेला बैल, चारचाकी वाहन, छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड आदी जप्त करण्यात आलं आहे. जळगाव जिल्ह्यात गस्त घालत असताना पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे मुक्ताईनगर येथून गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला तसेच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी वाहनासह पसार झाले. या दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जळगाव ते अकोला असे तब्बल १०० किलोमीटरपर्यंत आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला. अकोला पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली, यावेळी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने वाहन रिव्हर्स घेऊन पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील खाली पडले. त्यानंतर त्यांनी आहे त्या अवस्थेत उभे राहून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यादरम्यान इतर तिघे फरार झाले.
घटनेत पोलीस निरीक्षक संदीप पाटील जखमी झाले असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव ते अकोला तब्बल शंभर किलोमीटरच्या पाठलाग करून आरोपीला अटक करणारा संदीप पाटील यांच्या धाडसाचे पोलीस दलात कौतुक केलं जात आहे. या घटनेबाबत पोलिस अधीक्षक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेची माहिती देत या प्रकरणात चोरी गेलेला बैल, चारचाकी वाहन तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.