कराडमधील नामांकीत महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या कॅन्सग्रस्त आरोपीला पोलसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
कराड – कराडमधील दोन नामांकीत महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ व्हॉटसअप ग्रुपमध्ये व्हायरल करण्यात आले होते. एका महिला डॉक्टरला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली होती. सहकाऱ्यांसोबतचे अश्लील व्हिडीओ पाहून या महिला डॉक्टरला जबर धक्का बसला होता. प्राथमिक तपासामध्ये हे व्हिडीओ एआय च्या मदतीने तयार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून यातील एकजण हा कराडचाच आहे तर दुसरा आरोपी पंजाबचा आहे. धक्कादायक बाब ही आहे की या दोघांनाही कॅन्सर झालेला आहे.
पोलिसांत महिला डॉक्टरने तक्रार केली असता पोलिसांनी व्हॉटसअप ग्रुपमधील व्हिडीओंच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा केले. त्यावरून त्यांनी व्हिडीओ कुठून आलेत याचा तपास सुरू केला आणि आयपी एड्रेस शोधून काढला. हा आयपी एड्रेस पंजाबमधला निघाला होता. पंजाबमधून पोलिसांनी विकास शर्मा याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या तोंडून राजू शिंदे याचे नाव कळाले. राजू शिंदे हा कराडचाच असून तो विकास शर्मा याचा मित्र आहे. राजू शिंदे याला ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या प्रकारामागचा मुख्य आरोपी हा राजू शिंदे असल्याचे निष्पन्न झाले. विकास शर्मा आणि राजू शिंदे यांची ओळख नॅचुरोपथीचे शिक्षण घेत असताना झाली होती. दोघांनी कश्मीरमध्ये शिक्षण घेतले होते. विकास शर्मा याच्याप्रमाणे राजू शिंदे यालाही कॅन्सरची लागण झालेली आहे. राजूने हे कृत्य का केले याचा पोलिसांनी शोध लावण्यात सुरूवात केली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, राजू शिंदे याने कराडमध्ये नॅचुरोपथीचे सेंटर सुरू केले होते. या सेंटरची पाहणी करण्यात आली होती आणि त्यात अनियमितता आढळली होती, ज्यामुळे राजू शिंदेचे लायसन्स रद्द करण्यात आले होते. या सगळ्याला दोन महिला डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जबाबदार असल्याचा राजू शिंदेचा आरोप होता. त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून त्याने या भयानक गोष्टी केल्याचा पोलिसांना संशय आहे.