पोलीस म्हणून आले आणि एटीएम लूटून पसार झाले; वाशी पोलीसांनी आठ जणांना बेंगळुरू येथून ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यावर बनावट पोलिसांनी हल्ला करून तब्बल ३१ लाख ७३ हजार रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडामधील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सुरू असताना अचानक आठ जणांनी घटनास्थळी प्रवेश केला. त्यांनी स्वत:ला पोलिस असल्याचे भासवले आणि कर्मचाऱ्याला बाजूला नेऊन त्याच्याकडील रक्कम घेऊन जबरदस्तीने पाम बीच मार्गावर नेले. तेथे त्याला मारहाण करत रक्कम हिसकावून घेतली आणि तेथून पसार झाले.
घटनेनंतर लगेचच वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयितांचा माग काढत कर्नाटकमधील बेंगळुरू येथे धाड टाकली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तेथे आठ जणांना अटक करण्यात आली. उपायुक्त पंकज डहाणे (परिमंडळ १) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, ही पूर्वनियोजित लूट होती. आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. तपासादरम्यान हे स्पष्ट झाले की, फिर्यादीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडूनच ही महत्त्वपूर्ण माहिती दरोडेखोरांना देण्यात आली होती. त्यामुळेच आरोपी योग्य वेळी घटनास्थळी पोहोचू शकले.’
या प्रकरणात आता पोलीस अधिक खोल तपास करत असून, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल, आणि लुटलेली रक्कम कुठे लपवली गेली आहे याचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याच्या मास्टरमाइंडचा शोधही सुरू आहे. ‘तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन्स आणि सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही ही कारवाई केली. तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे – ही माहिती आरोपींना फिर्यादीच्या ओळखीच्या व्यक्तीकडून मिळाली होती. पुढील तपास नवी मुंबई पोलीस करीत आहे,’ अशी माहिती डहाळे यांनी दिली.