साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत शिपायानेच मारला साईंच्या दानावर लाखोंचा डल्ला; शिर्डी पोलसांनी आरोपीला घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
शिर्डी – शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या शिपायाने साईंच्या दानावरच लाखों रुपयांचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चोरी करणारा आरोपी बाळासाहेब नारायण गोंदकर याला पोलीसांनी शुक्रवारी अटक केली आहे. बाळासाहेब नारायण गोंदकर, असं या आरोपीचं नाव आहे. तो साई संस्थानामध्ये लेखा शाखेत कर्मचारी म्हणून काम करत होता. साधारण आठ दिवसांपूर्वी साई संस्थाननं सीसीटीव्ही चित्रीकरणाचा आधार घेत शिर्डी पोलीसात या घटनेची रितसर फिर्याद दिली होती. त्यानंतर आठ दिवसापासून वेगवेगळ्या युक्त्या वापरत फरार असलेल्या गोंदकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
साई संस्थानने दिलेल्या तक्रारी नुसार एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने ४, ८ आणि ११ एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेल्याच स्पष्ट झाल होतं. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान होती. मंदिर संस्थानाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना आढळला. त्याने त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत होते. त्यानंतर साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अखेर शिर्डी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.