ऑपरेशन थंडर’अंतर्गत नागपुर पोलिसांना यश; ५० हजार रुपयांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

Spread the love

ऑपरेशन थंडर’अंतर्गत नागपुर पोलिसांना यश; ५० हजार रुपयांच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपूर – नागपूर शहरात ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत पोलिसांकडून सुरू असलेल्या ड्रग्जविरोधी मोहीमेला मोठे यश मिळाले आहे. जरीपटका पोलिसांनी चावला चौक परिसरात एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज विकताना दोन तरुणांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर ड्रग्ज विक्रेत्यांना चांगलाच दणका बसला आहे. पमिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरातील चावला चौक येथे दोन तरुण एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ कारवाई करत छापा टाकला. या छाप्यात नितेश विखाणी (२८) आणि आकाश केवलरामणी (२६) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान दोघांकडून सुमारे ५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची बाजारातील किंमत सुमारे ५०,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

पीआय क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितेश आणि आकाश हे गेल्या काही महिन्यांपासून जरीपटका आणि परिसरात एमडी ड्रग्जचा पुरवठा करत होते. त्यांचे अनेक ‘स्थायी’ ग्राहक होते आणि मुख्यत्वे युवक वर्गाला लक्ष्य केले जात होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर या दोघांवर नजर ठेवण्यात आली होती. योग्य वेळ साधून कारवाई करण्यात आली आणि अखेर त्यांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींनी हे अमली पदार्थ कुठून आणले, कोणाच्या माध्यमातून ते नागपूरमध्ये वितरित करत होते, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन थंडर’मोहिमेतून नागपूर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. ही अटक या मोहिमेतील आणखी एक यशस्वी पाऊल ठरली आहे. नागरिकांनी अशा बेकायदेशीर व्यवहारांबद्दल माहिती पोलिसांना देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon