पुण्यातील गृहप्रकल्पात दोनशेहून अधिक फ्लॅटधारकांची फसवणूक; गुन्हे दाखल करण्याची मागणी

Spread the love

पुण्यातील गृहप्रकल्पात दोनशेहून अधिक फ्लॅटधारकांची फसवणूक; गुन्हे दाखल करण्याची मागणी

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आळंदी परिसरात “फॉर्च्यून हिलटॉप” आणि “फॉर्च्यून वेदाज” नावाने दोन गृहप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. परंतु, या प्रकल्पात फ्लॅट खरेदी करणाऱ्या २०० हून अधिक ग्राहकांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पांच्या संदर्भात नागरिकांची तक्रार आहे की, प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत “फॉर्च्यून हिलटॉप” प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते, तर “फॉर्च्यून वेदाज” प्रकल्पाचा पहिला टप्पा ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याचे ठरले होते. परंतु, प्रत्यक्षात कोणतंही काम झालेलं दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना घर नेमकं कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. हे गृहप्रकल्प दोनशेहून अधिक ग्राहकांनी बुक केले होते आणि डिसेंबर २०२३ मध्ये फ्लॅट वितरीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, कोविड काळात कामांमध्ये अडचणी आल्या. त्यानंतर मार्च २०२५ ही तारीख उलटली. तरीही घरांची वितरण प्रक्रिया अजून सुरू झाली नाही.

नागरिकांनी या प्रकरणाबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये मकरंद सुधीर पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मकरंद पांडे आणि नितीन धिमधिमे या दोघांनी एकत्रितपणे संबंधित प्रकल्पांची बांधकामं सुरू केली होती. मात्र, मकरंद पांडे यांनी हे काम अपूर्ण ठेवून जबाबदारी झटकली असून गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी प्रकल्पाच्या कामातून काढता पाय घेतला आहे. त्यांचं वर्तन संशयास्पद असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. फ्लॅट घेणाऱ्यांना आता घराच्या हप्त्यांसाठी पैसे मोजावे लागत आहेत. त्यांना त्यांचे हक्काचे घर अद्याप मिळालेले नाही. यामुळे अनेक वृद्ध नागरिक आणि कामगार वर्गही अडचणीत आला आहे. पोलिस यंत्रणेने मकरंद पांडे यांच्या विरोधात सखोल तपास करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.फॉर्च्यून डेव्हलपर्सचे भागीदार नितीन शंकर धिमधिमे यांनी त्यांच्या भागीदार मकरंद सुधीर पांडेवर गंभीर आरोप केले आहेत. धिमधिमे यांनी म्हटले की, “फॉर्च्यून हिलटॉप आणि फॉर्च्यून वेदाज” या दोन्ही गृहप्रकल्पांचे काम प्रत्यक्षात प्रगतीपथावर नाही. माझ्या भागीदाराने, मकरंद पांडे यांनी नागरिकांची फसवणूक केली आहे आणि त्याने या प्रकल्पाचे काम थांबवले आहे.”

एक भागीदार नितीन धिमधिमे यांचे स्पष्टीकरण:

नितीन धिमधिमे म्हणाले की, “मकरंद पांडे यांनी लोकांशी संवादही टाळला आहे आणि आता तो वेगवेगळी कारणं देत आहे. त्याने जवळपास तीन कोटी रुपये घेऊन प्रकल्पातून पळ काढला आहे. आता, त्याच्याशी संपर्क साधला असता, तो प्रतिसाद देत नाही आणि वारंवार आपले ठिकाण बदलत आहे.” त्यामुळे पांडेवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, असे नितीन धिमधिमे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon