मुंबईकरांच्या खिशावरील भार वाढला; सीएनजी गॅस महागला, सीएनजी गॅससाठी जादा पैसे मोजावे लागणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – रविवार १ जून पासून मुंबई महानगर प्रदेशात सीएनजी गॅससाठी जरा जादा पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे दोन महिन्यांनंतर सीएनजी च्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. १ जूनपासून सीएनजी दरात किलोमागे ५० पैशांनी वाढ होणार आहे. मात्र, घरगुती वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या पाइपलाइन गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.या दरवाढीनंतर मुंबई, ठाणे आणि एमएमआर मधील सीएनजी चा नवा दर ८० रुपये प्रति किलो झाला आहे, तर पाइपलाइन गॅसचा दर ४९ रुपये प्रति युनिट वर कायम आहे. मुंबई आणि परिसरातील लाखो रिक्षा, टॅक्सी व बस चालक सीएनजी वर अवलंबून आहेत. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका त्यांच्यावर आणि पर्यायाने प्रवाशांवरही बसणार आहे. यापूर्वीच फेब्रुवारी २०२४ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यांमध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी इंधन दरवाढीचा मुद्दा कारण म्हणून दिला गेला होता. मुंबई रिक्षा युनियनचे नेते थंपी कुरियन यांनी सांगितले की, “महानगर गॅस लिमिटेडने मागील काही महिन्यांपासून केलेली दरवाढ अनावश्यक आहे. दरवाढीमुळे भाडे सामान्य रिक्षा चालकांवर अधिक भार येणार असल्याचे त्यांनी म्हटले.