पुण्यात नवविवाहितेचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; पतीसह सासू, दीरावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय, असा संताप येणाऱ्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच लोहगाव परिसरात पती, सासूच्या छळामुळे नवविवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. वडिलांना गाडी द्यायला सांग, अशी मागणी पतीने तिच्याकडे केली, तसेच सासूने ‘तू पांढऱ्या पायाची आहेस,’ असे टोमणे मारल्याची फिर्याद नवविवाहितेने दिली आहे. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २३ वर्षीय नवविवाहितेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीचा अजय याच्याशी २२ मे २०२२ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर सहा महिन्यांनी पतीने किरकोळ कारणावरून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘तू माहेरावरून काय आणले? तुझ्या आई-बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही,’ असे टोमणे मारले. ‘मला पैशांची गरज आहे. तुझ्या वडिलांना मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास सांग,’ असे पतीने तिला सांगितले. तरुणीने त्याला नकार दिला. तेव्हा त्याने तिचा गळा दाबून पुन्हा मारहाण केली. दीरानेसुद्धा शिवीगाळ केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर २१ मे रोजी ‘पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले, तसेच तुलाही बाहेर काढीन. तू पांढऱ्या पायाची आहेस. तू घरात आल्यापासून शांतता नाही,’ असे टोमणे सासूने तिला मारले. छळ असह्य झाल्याने तिने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्याची वाटचाल हुंडाबळीकडे सुरू असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे.