नाशिकमध्ये अन्न आणि औषध विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत ट्रक लुटणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या; तपासात निघाले ‘खबरी’लाल
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून मंत्री नरहरी झिरवाळ यांनी देखील काही दिवसांपूर्वी स्वत: भेसळची पाहणी करताना गाड्या अडवल्याचं दिसून आलं. आता, नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातून तीन बोगस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आपण अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत या तोतया अधिकाऱ्यांनी ट्रकचालकाकडून पैशांची मागणी करत ट्रकच लुटण्याचा घाट घातला होता. मात्र, पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून नाशिकच्या येवला येथून सुपारी घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचवेळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवत तिघांनी सुपारी घेऊन जाणाऱ्या आणखी दोन ट्रक लुटण्याचा प्रयत्न केल्याने अन्न व औषध प्रशासनाची कारवाई चर्चेत आली आहे. अन्न औषध प्रशासनाने केलेले कारवाई ही येवला परिसरात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं तर पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत लुटण्यात आलेले ट्रक हे देखील येवल्यातूनच ताब्यात घेतल्याचा पोलिसांनी सांगितले त्यामुळे या कारवाईने आता संभ्रम निर्माण झाला असून पुढील तपास नाशिक पोलीस करत आहे.
येवला टोलनाक्याच्या शंभर मीटर परिसरातून तिघांनी दोन ट्रक अडवून ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर, तोतया अधिकाऱ्यांनी ट्रक चालकाचे कागदपत्र, मालाचे कागदपत्र, मोबाईल आणि सोळा हजार रुपये कॅश काढून घेतली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगून ही ट्रक लुटण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या उद्योग भवन येथील अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेर त्या ट्रक आणण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे ट्रकची लूट करणारे हे तिघे अन्न व औषध प्रशासनाचे खबरी असल्याचे तपासातून समोर आले आहे. ट्रक मालकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खोलात जाऊन माहिती विचारल्यानंतर हे सत्य समोर आले. शहरातील गरवारे पॉईंट येथून ताब्यात घेतले, निफाड येथून अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ट्रक देखील ताब्यात घेतला अशी माहिती देण्यात आली आहे.
चारुदत्त भिंगारकर, मयूर दिवटे आणि नवीन सोनवणे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता,१७ मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आले आहे. पोलिसांनी दरोडाच्या गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.