चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा, घरफोडी करणारे सराईत टोळी गजाआड
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या इराणी आणि शिकलगार टोळीच्या एकूण चार सराईत गुन्हेगारांना कल्याण गुन्हे शाखेने अटक करुन त्यांच्याकडून एकूण ३६,२९,७२५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात एका महिलेचा देखील समावेश आहे. वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसिम काला, कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी, शिवासिंग अमिरसिंग बावरी आणि पुनमकौर अमिरसिंग बावरी अशी यांची नावे आहेत. इराणी, शिकलगार टोळीतील चोरट्यांच्या चौकशीतून २९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवली परिसरात सोनसाखळी, वाहन चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे वाढले होते. या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटला दिले होते. या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटच्या पथकाने कल्याण डोंबिवली परिसरात घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास आपल्या हाती घेतला होता. याच तपासादरम्यान पथकाने सोनसाखळी चोरीसाठी कुख्यात असलेल्या इराणी टोळीतील अट्टल चोरट्यांवर पाळत ठेवली. यावेळी इराणी टोळीतील दोन सक्रिय सदस्य सोनसाखळी व वाहन चोरीचे गुन्हे करीत असल्याची माहिती पथकास मिळाली. तर कल्याण परिसरात घरफोडी सारखे गुन्हे करणाऱ्या शिकलगार टोळीवर देखील गुन्हे शाखेच्या पथकाने करडी नजर ठेवली होती. शिकलगार टोळीतील दोघे अट्टल चोरटे कल्याण गावातील खोणीगावात लपून असल्याचे पोलिसांना कळताच पथकाने शिवासिंग अमिरसिंग बावरी (२५, खोणीगाव, कल्याण), आणि पूनमकौर अमिरसिंग बावरी (३७, खोणीगाव, कल्याण) या दोघांना अटक केली. या चारही अटकेतल्या आरोपींच्या चौकशीतुन दरोड्याचा एक, सोनसाखळी चोरीचे २०, वाहन चोरीचे ५, घरफोडीचे ३ असे एकूण २९ गुन्हे उघड झाले आहेत. तर आरोपींच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, सहा चारचाकी वाहन व इतर ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध- १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि सर्जेराव पाटील, सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि किरण भिसे, पोउपनि विनोद पाटील, सापोउपनि दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, सुधीर कदम, सचिन भालेराव, वसंत चौरे, पांडुरंग भांगरे, विजय जिरे, विलास कड्डु, अनुप कामत, प्रशात वानखेडे, उल्हास खंडारे, अदिक जाधव, सचिन वानखेडे, दिपक महाजन, प्रविण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मंगल गावित, बालक अमोल बोरकर यांनी केली आहे.