महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा निराशाच? फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरात ऐवजी उत्तर प्रदेशात, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे. याआधी देखील या प्रकल्पावरुन राज्यातलं राजकारण तापलं होतं. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला हलवल्याचा आरोप करण्यात आला होता. फॉक्सकॉन ही परदेशी सेमीकंडक्टर कंपनी आहे. ही कंपनी देशातील वेदांता कंपनीसोबत सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट बनवणार होती. सुरुवातीला हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. पण नंतर तो प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्याचा आरोप केला जात होता. यानंतर प्रचंड राजकीय गदारोळ झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फॉक्सकॉनला महाराष्ट्राच यावंच लागेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची आता पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. भारतातला सहावा सेमीकंडक्टर प्रकल्प हा आता उत्तर प्रदेशच्या जेवर येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ हजार ७०६ कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. नॅशनल सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
फॉक्सकॉन आणि एचसीएल यांच्या संयुक्तपणाने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याआधी वेदांता कंपनीसोबत फॉक्सकॉनची पार्टनरशिप झाली होती. पण काही कारणास्तव दोन्ही कंपन्यांचं एकत्र काम होऊ शकलं नाही. यानंतर आता एचसीएल आणि फॉक्सकॉन एकत्रितपणे उत्तर प्रदेशच्या जेवरमध्ये हा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची सुद्धा मंजुरी मिळाली आहे.