उसनवारीचे ५ लाख रुपये परत न दिल्याच्या रागाच्या भरात डोक्यात दगड मारून ५४ वर्षीय इसमाची हत्या

Spread the love

उसनवारीचे ५ लाख रुपये परत न दिल्याच्या रागाच्या भरात डोक्यात दगड मारून ५४ वर्षीय इसमाची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – आजारपणाच्या नावाखाली हातउसने घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात घडली. खून करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींच्या मुसक्या कोंढवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आवळल्या. रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता कोंढवा पोलिसांना माहिती मिळाली की, ज्योती हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेला आहे. तत्काळ घटनास्थळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रऊफ शेख, नवनाथ जगताप, सहा. पो. नि. राकेश जाधव आणि तपास पथक रवाना झाले. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता, एका इसमाच्या डोक्यात दगडाने मारून खून केल्याचे निदर्शनास आले. मृत व्यक्तीच्या कपड्यांची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशातून ओळखपत्र मिळाले. त्यावरून त्याची ओळख सुभाष रघुवीर परदेशी (५४) अशी पटली.

पोलिसांनी मृताच्या पत्नीशी संपर्क साधला असता, सुभाष हे रात्री त्यांचे मित्र अभय कदम आणि बादल शेरकर यांच्यासोबत गेले असल्याची माहिती मिळाली. तपास अधिक गतिमान करत पोलिस अंमलदार विशाल मेमाणे यांना बातमी मिळाली की दोन्ही आरोपी उत्तमनगर, अहीरेगेट परिसरात लपून बसले आहेत. पोलिसांनी सापळा रचून आरोपी अभय जगन्नाथ कदम (२४) आणि बादल शाम शेरकर (२४)यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांनी दिलेल्या कबुलीनुसार, मृत सुभाष परदेशी यांनी आजारपणाच्या कारणावरून आरोपींकडून ५ लाख रुपये उसनवारी घेतले होते, मात्र ते पैसे परत न दिल्याने रागाच्या भरात डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला. मृताची पत्नी हेमलता सुभाष परदेशी यांच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८२/२०२५ नुसार, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९३-(१), ३५१(२) (३), ३५२ (३) (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon