गडचिरोलीत १० हजार क्विंटल धान घोटाळा प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ५ जणांना अटक तर १० आरोपी अद्यापही फरार
योगेश पांडे / वार्ताहर
गडचिरोली – जिल्ह्यात चर्चेत असलेल्या धान घोटाळ्याप्रकरणी देऊळगाव खरेदी केंद्राच्या ५ संचालकांना कुरखेडा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. धान घोटाळा प्रकरणी खरेदी केंद्राच्या अध्यक्ष सचिवासह १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यातील दोघांना यापूर्वीच अटक झाली असून आता आणखी पाच जणांना अटक केल्याने अटकेतील आरोपींची संख्या ७ झाली आहे. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये, आणि संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे यांचा समावेश आहे. घोटाळ्यातील मुख्य आरोपी उप प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेच व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह १०आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात गाजलेल्या २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षात तब्बल १० हजार क्विंटलची धान खरेदी तफावत देऊळगाव खरेदी केंद्रावर आढळून आली होती. त्याप्रकरणी, चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आल्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन कुरखेडा पोलिसांनी आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण १७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (5), 318 (4), 3 (5) अन्वये गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान, चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना आधीच अटक करण्यात आली. काल आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक व देऊळगावच्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र मेश्राम हे अद्याप फरार आहेत. पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ प्रकरणाचा तपास करीत आहेत.