मुलाची हत्या करुन वडिलांनी स्वत:लाही संपवलं; पालघरमधील धक्कादायक घटना, परिसरात एकच खळबळ
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – वडिलांनी आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना जव्हार तालुक्यात घडली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये (१५) असे मृत मुलाचे व शरद रघुनाथ भोये (४०) जीवन संपवणाऱ्या वडिलांचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत परिसरात राहणारे शरद रघुनाथ भोये मुंबई येथे बेस्ट सेवेमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत होते. शरद भोये यांचे वडील रघुनाथ जानू भोये बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपळशेत होळीची माळी येथील त्यांच्या शेतावरील घरी गेले असता त्यांना एक धक्कादायक चित्र घरात दिसून आले. त्याचा पंधरा वर्षाचा नातू भावेश याचा मृतदेह घरात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद भोये यांनी पिंपळशेत परिसरातील होळीची माळी येथे शेतावरील घरात स्वतःच्या मुलाचे जमिनीवर डोके आपटून दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर नायलॉन दोरीच्या सहाय्याने घरातील दुसऱ्या खोलीत लोखंडी अँगलला गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली. शरद भोये यांनी मुलगा भावेश याची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी भोये यांच्या कुटुंबीयांची देखील पोलिस चौकशी करण्यात येत असून अधिक तपास जव्हार पोलीस करीत आहेत.