बीडमध्ये एसपींच्या घरी पोलीस कर्मचारीच पित होता गांजा, स्वत: एसपी काँवत यांनी रंगेहात पकडलं

Spread the love

बीडमध्ये एसपींच्या घरी पोलीस कर्मचारीच पित होता गांजा, स्वत: एसपी काँवत यांनी रंगेहात पकडलं

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंदे आणि गैरकारभारावर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्य कुठे नव्हे तर थेट पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानीच रविवारी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान एका कर्मचाऱ्याला एसपींनीच गांजा पिताना रंगेहात पकडले. या प्रकारामुळे आता पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असून यापूर्वीच्या घटनांनी बीड जिल्ह्यातील पोलीस दलाची बदनामी कमी होती की काय, त्यात नव्याने भर पडली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू बहिरवाळ असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या निवासस्थानाच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने ते सध्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. रविवारी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान ते आपल्या कुटुंबासह घराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाळू बहिरवळ हा दरवाजा लाऊन आता गांजा पित होता.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्वतः खूप वेळ दरवाजा ठोठावूनही तो दार उघडत नसल्याने काँवत यांना शंका आली. काही वेळानंतर बाळूने दरवाजा उघडला तेव्हा आत गांजाचा वास आला. या प्रकारानंतर संतापलेल्या नवनीत काँवत यांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना बोलावून बाळू बहिरवाळची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, बाळू बहिरवाळ याने गांजाचे सेवन केल्याचे अहवालातून समोर आल्यानंतर त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कर्मचारीच कायद्याचे पालन करणार नसतील तर जिल्ह्यात खाकीचा धाक राहणार कसा? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon