रेल्वे स्थानकात गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love

रेल्वे स्थानकात गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश

गुजरातच्या चार महिलांना अटक; एक लाख रुपयांचे चोरीचे सामान हस्तगत

योगेश पांडे / वार्ताहर 

नागपूर – नागपूर रेल्वे स्थानकात गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे मौल्यवान सामान चोरणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा नागपूर लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गुजरातच्या भावनगर येथील चार महिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून जवळपास एक लाख रुपयांचे चोरीचे सामान हस्तगत करण्यात आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर अलीकडेच दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान समोर आले की, ही महिला टोळी लहान मुलांसह रेल्वे स्थानकाच्या परिसरात थांबत होती. त्या प्रवाशांवर नजर ठेवून योग्य संधी साधून त्यांचे मौल्यवान सामान चोरून नेत असत. या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सोमवारच्या सकाळी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी चार महिलांना रंगेहाथ अटक केली. या महिलांची नावे गीता सोलंकी, नीता सोलंकी, सोनिया सोलंकी आणि मीनू सोलंकी अशी आहेत. या सर्व महिला गुजरातमधील भावनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत दोन लहान मुलेही आढळून आली.

पोलिस तपासात असेही उघड झाले आहे की, या महिलांनी केवळ नागपूरमध्येच नव्हे तर देशभरातील अहमदाबाद, सूरत आणि सिकंदराबाद यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरही अनेकदा चोरी केली आहे. त्यांच्याविरोधात विविध शहरांतील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. दरम्यान, या अटकेनंतर नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सदर टोळीच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या टोळीने गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांचे सामान चोरून अनेकांना आर्थिक नुकसान केले आहे. यामुळे प्रवाशांनी आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon