इन्स्टाग्रामवर बहिणीचा फोटो टाकणाऱ्या युवका कडून जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; अवघ्या पाच तासात आरोपी जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवर का पाठवला याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकाला दगडावर जोरात आपटून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अंथुर्णे येथे ही भयंकर घटना घडली असून याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ ५ तासांमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या घटनेमध्ये आकाश मुशा चौगुले (२२) याची हत्या करण्यात आली असून राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार (२१) याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. राजेश पवार याने आकाश चौगुले याच्या मोबाईवर इन्स्टाग्रामवर त्याच्या बहिणीचा फोटो मेसेज द्वारे पाठवला होता. सदर मेसेजचा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले आणि त्याची आई शांतबाई चौगुले हे राजेश पवार याच्या घरी शनिवारी रात्री साडेसात वाजता गेले होते. यावेळी फोटो पाठविल्याचा जाब विचारल्याच्या रागातून राजेश पवारने वाद घातला.
त्यानंतर राजेश पवार याने हाताने आकाश चौगुले याचा गळा पकडून जोरात दाबला आणि त्याला उचलून घरोसमोरच्या दगडवार जोरात आपटलं. यामध्ये आकाश चौगुलेच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्त येऊ लागलं. थेट डोक्याला मारल्याने आकाश याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी राजेशने घटनास्थळावरुन पळ काढला. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी तीन पोलीस पथकं रवाना केली. पोलिसांनी कडबनवाडी गावच्या हद्दीमधील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये लपून बसलेल्या पवार याला ताब्यात घेवून अटक केली. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सह पोलीस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रेय चांदणे, जगदीश चौधरी, विकास निर्मळ, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी केली आहे.