पोलिसांना हिसका देत पळ काढलेल्या आरोपीला बारा तासांच्या पाठलागानंतर कसारा घाटातील जंगलातून पुन्हा ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये प्राण घातक हल्ल्याच्या गुन्ह्यात संशयित असलेला आरोपी क्रिश शिंदे याला भद्रकाली पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान कोर्टात हजर केल्यानंतर क्रिश शिंदे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीला आणताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन त्यानं चक्क धूम ठोकल्याची घटना घडली आहे. क्रिश शिंदे हा पळून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली असून संशयित आरोपी पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीला मदत करणारा दुचाकी चालक देखील सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. या संदर्भात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलीस ठाण्याच्या आवारातून आरोपी पळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. दरम्यान, भद्रकाली पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र क्रिश शिंदेचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यासाठीचे पोलिसांसमोरचे आव्हान उभे झाले होते. मात्र भद्रकाली पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या आरोपीचा सतत तपास केला असता, अखेर बारा तासांच्या सिनेस्टाईल पद्धतीच्या पाठलागानंतर त्याला कसारा घाटातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली आहे.