कधीकाळी एडमिशनसाठी रांगा, आता महाराष्ट्र दिनीच दादरमधील मराठी शाळा बंद?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – कधीकाळी ज्या शाळेसमोर एडमिशनसाठी रांगा लागायच्या त्याच मराठी शाळेचे अस्तित्व आता संपुष्टात येत असल्याचे भीतीदायक वास्तव समोर आले आहे. मराठी भाषिकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये आणखी एक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. पुरेशी पटसंख्या नसल्याने शाळेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या एस. व्ही. नाबर गुरुजी विद्यालय आगामी शैक्षणिक वर्षापासून बंद होण्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र दिनीच मराठी शाळा बंद होत असल्याची चर्चेने हळहळ व्यक्त केली जात आहे. नाबर गुरुजी विद्यालय ही दादर, प्रभादेवी ते जवळपासच्या परिसरात प्रसिद्ध असलेल्या शाळेपैकी एक आहे. सुरुवातीला ही शाळा पिंटो व्हिला बॉईज हायस्कूल या नावाने ओळखली जात असे. त्यानंतर इंडियन एज्युकेशन सोसायटी आणि या शाळेसाठी झटणारे नाबर गुरुजी यांचे नाव या शाळेला देण्यात आले. या शाळेत प्रवेश घेणे शैक्षणिकदृष्ट्या अभिमानास्पद असल्याचे म्हटले जायचे.
आता मात्र, मागील काही वर्षात रोडावलेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमुळे या मराठी शाळेला टाळं लागणार आहे. राज्यात मराठी भाषा वाचवण्यासाठी, संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की ओढावत आहे. मराठी संस्कृतीची छाप असलेला आणि मराठी बहुल भागातील शाळा बंद होत असल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये कलाकार, अभियंते, डॉक्टर, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. शाळा बंद होण्याच्या वृत्ताने माजी विद्यार्थ्यांमध्ये ही हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या या शाळेत नववी आणि दहावीच्या वर्गात प्रत्येकी ९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर, पाचवी ते आठवी या वर्गात एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा किलबिलाट, गोंधळ असणाऱ्या शाळेत सध्या शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे. आता, शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यास त्यांना इतर शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. यंदाच्या १० वीच्या परीक्षेला यंदा फक्त ३५ विद्यार्थी बसले होते. कधीकाळी हा आकडा २०० ते ३०० च्या घरात होता. दहावीसाठी कमाल ५ तुकड्यांमध्ये वर्ग भरवले जात होते.
मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याच्या मराठी भाषिकांचा हट्टाहास आता मराठी शाळांच्या मुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. अपुऱ्या पटसंख्येचे कारण पुढे करीत आतापर्यंत अनेक मराठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. आता महाराष्ट्र दिनीच आणखी एक मराठी शाळा बंद होणार आहे.दरम्यान शाळा बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव संस्थेने शिक्षण विभागाकडे पाठवला नसल्याची माहिती इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्तांनी दिली आहे. शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय झाला नाही. पण, मराठी माध्यमांच्या मुलांची पटसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.