अश्लील डान्स अन् ग्राहकांची गर्दी, बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं मध्यरात्री बीड पोलिसांनी मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. केज तालुक्यातील उमरी शिवार परिसरात एका कला केंद्राच्या नावाखाली अश्लील कृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी केली असता कला केंद्रात अश्लील प्रकार सुरू असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. या प्रकरणी पोलिसांनी कला केंद्राच्या मालकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील उमरी शिवार परिसरात महालक्ष्मी कला केंद्र नावाचं एक कला केंद्र आहे. या ठिकाणी गेल्या काही काळापासून वेश्याव्यवसाय सुरू होता. कला केंद्राचा मालक आणि मॅनेजर काही महिलांना वेश्याव्यवसायात ढकलून त्यांच्याद्वारे सेक्स रॅकेट चालवत होते. या बाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर बीड पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री महालक्ष्मी कला केंद्रावर छापेमारी केली.
या छापेमारीत संबंधित प्रतिष्ठानाचा व्यवस्थापक कला केंद्रात काम करणाऱ्या महिलांना अनैतिक कृत्यांमध्ये गुंतवून वेश्याव्यवसायाला चालना देत असल्याचं आढळून आलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दहा महिलांची सुटका केली. त्यानुसार, राज्याच्या वतीने अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA), कलम ३, ४, ५ आणि ६, तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १४३ अंतर्गत कला केंद्राच्या मालकासह, मालकाचा मुलगा आणि संबंधित व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. हे कला केंद्र शिवसेना ठाकरे गटाचे रत्नाकर शिंदे यांचं असल्याचं समजत आहे. जुलै २०२३ ला देखील या कलाकेंद्रावर पोलिसांनी छापेमारी केली होती. तरीही सर्रासपणे याठिकाणी सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.