अहिल्यानगरच्या निवासी शाळेतील प्रकार; पट्टा, काठी, लाथा-बुक्क्यानी मुलांना रिंगण करुन मारलं
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – अहिल्यानगरच्या जामखेड येथील एका निवासी शाळेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसतीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील मुलांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांना विद्यार्थ्यांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयात काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. मुलांना कमर पट्ट्याने, कानशिलात, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. एकप्रकारची रँगिंगच या मुलांची करण्यात आली.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका लहान मुलाला रिंगण करून बेल्टने मारहाण करण्यात आली आणि या मारण्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. संबंधित घटना सोमवारी घडल्याची माहिती आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान याबाबत पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर लोक कमेंट करून या मुलांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दीपक केदार यांनी या घटनेवरून काही प्रश्न उपस्थित करत सरकारला सवाल केला आहे. “मुलांच्या रूममध्ये काय चाललंय, याकडे कुणाचं लक्ष नाही. मुले ओरडत असतानाही त्यांचा आवाज कोणाला ऐकू येत नाही. मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा यातून दिसतो. मुख्याध्यापक आणि शिक्षक मुलांकडे लक्ष देत नाहीत. वॉर्डन कुठे आहे? त्यांच्याकडून कोणतीही देखरेख नाही”, असं दीपक केदार यांनी म्हटलं आहे.