आयपीएलचा सामना चालू असताना फोनवर जोरात बोलला म्हणून थेट इमारतीवरून खाली फेकलं; तरुणाचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – संताप माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो, असं सर्रास म्हणतात. त्याची काही उदाहरणंही समोर आलेली आहेत. अनेकांनी रागाच्या भरात हादरवून टाकणारे कृत्य केल्याचं तुम्ही ऐकलं असेल. संतापाच्या भरात घडलेला असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. आयपीएलचा सामना चालू असताना फोनवर जोरात बोलला म्हणून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चक्क इमारतीवरून खाली फेकून दिलं आहे. यात फोनवर बोलणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र चौहान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कांदिवलीच्या साईबाबा नगर येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी अफसर जमीर आलम नावाच्या २५ वर्षीय तरुणाला अटक केलं आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र चौहान आणि अफसर जमीर आलम यांच्यात मोबाईलवर जोरात बोलण्यावरून वाद झाला. कांदिवलीच्या साईबाबानगरात दैवी इटर्निटी या इमारतीचे बांधकाम चालू आहे. त्यासाठीच्या कारपेंटिंगसाठी सी. जी. लाईफस्पेस या कंपनीकडून साधारण १२ ते १३ कामगार मागवण्यात आले होते. काम संपल्यानंतर रात्री हे सर्वजण इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आयपीएल क्रिकेटचे सामने पाहात बसले होते. यादरम्यान अफसर जमीरने जितेंद्रला तंबाखू मागितली होती. पण जितेंद्रने ती दिली नव्हती, यामुळे जमीर नाराज झाला होता. त्यानंतर रात्री दहा वाजता जितेंद्र चौहान मोबाईल फोनवर बोलत होता. त्यावेळी जमीरने त्याला मोबाईलवर ओरडून बोलू नको, असे सांगितले. त्यानंतर या दोघांमध्ये वाद चालू झाला. इतरांनी मध्ये येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही शांत केले. मात्र जितेंद्र उभा असताना अफसरणे त्याला जोराचा धक्का देत इमारतीच्या खाली लोटले. यातच जितेंद्रच्या मानेला जबर मार लागला. जितेंद्रला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सध्या अफसवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.