मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध युनिट कामांना हिरवा झेंडा
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सायबर सुरक्षा आणि गुन्हे नियंत्रणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅन, मोबाईल विक्टिम स्पॉट युनिट व्हॅन आणि अत्याधुनिक पोलिस टू-व्हीलरना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या उपक्रमाचा उद्देश घटनास्थळी त्वरीत आणि प्रभावी तपासणी सुनिश्चित करणं असून, त्यामुळे गुन्ह्याच्या तपास प्रक्रियेला अधिक गती आणि अचूकता मिळणार आहे.
मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅनद्वारे घटनास्थळीच प्राथमिक फॉरेन्सिक तपास करता येणार आहे, तर मोबाईल विक्टिम स्पॉट युनिटद्वारे पीडितांना त्वरित मदत मिळणार आहे. याशिवाय अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलिस टू-व्हीलर्सचा उपयोग वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी केला जाणार आहे. या प्रसंगी राज्य मंत्री योगेश कदम, पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती तसेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. ही नवी सुरुवात महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यक्षमतेला अधिक बळकट करणार असून नागरिकांच्या सुरक्षेला एक नवी दिशा मिळणार आहे.