अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला दणका, ‘त्या’ ५ पोलिसांवर गुन्हे दाखल होणार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा धक्का देत या प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने राज्य सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे.
अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात चौकशीसाठी आणताना एन्काऊंटर करण्यात आला होता मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा तपासात समोर आल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र, याच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेत जोपर्यंत एसआयटी अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होणार अशी भूमिका सरकारने घेतली होती. तर दुसरीकडे सरकारच्या या भूमिकेवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सोमवारी या प्रकरणाचा निकाल देत मुंबई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलिसांना देण्याचे आदेश देखील उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर आता पुढील दोन दिवसात या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे आणि स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीला या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर ऑगस्ट २०२४ मध्ये लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबर २०२४ रोजी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता मात्र एन्काउंटर फेक असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशीसाठी मजिस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले होते. २० जानेवारी २०२५ ला मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात एन्काऊंटर फेक असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. चौकशीसाठी जाताना मुंब्रा येथे अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर २ गोळ्या झाडल्या तेव्हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडल्या असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.