मैत्रिणीला कॉफीतून गुंगीचं औषध पाजून बेशुद्ध झाल्यावर मैत्रीणीचे ५ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरणाऱ्या तरुणीला अटक

Spread the love

मैत्रिणीला कॉफीतून गुंगीचं औषध पाजून बेशुद्ध झाल्यावर मैत्रीणीचे ५ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरणाऱ्या तरुणीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – यारों दोस्ती बडी ही हसीन है, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे…मैत्रीवरची अशी एक ना अनेक गाणी आपण आत्तापर्यंत ऐकली आहेत, ती बरीच लोकप्रियही झाली. मैत्रीचे अनेक दाखलेही दिले जातात, प्रत्येकाचाच कोणी ना कोणी चांगला मित्र किंवा मैत्रीण असते. पण पुण्यातील आंबेगावमध्ये मैत्रीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तिथे एका तरूणीने तिच्या मैत्रिणीला फसवून, कॉफीतून गुंगीचं औषध तिला पाजलं आणि ती बेशुद्ध झाल्यावर त्या तरूणीने मैत्रीणीच्या घरातले पावणे सहा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी संबंधित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत ऐश्वर्या संजय गरड (२५) या तरुणीला अटक करण्यात आली. मात्र मैत्रीण म्हणवणाऱ्या त्या तरूणीच्या कृत्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सगळी घटना ६ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता पुण्यातील सिंहगड कॉलेज जवळ असलेल्या एमराईड सोसायटी मध्ये घडली. फिर्यादी तरुणी ही तिच्या घरी असताना तिची मैत्रीण असलेली ऐश्वर्या घरी आली. यावेळी तिने येताना फिर्यादी तरूणीसाठी कोल्डकॉफी सोबत आणली. घरी आल्यावर तिने ती मैत्रिणीला प्यायला दिली. मैत्रिणीनं आणलेली कोल्डकॉफी कुठला ही विचार न करता फिर्यादी तरुणीने पिऊन टाकली. मात्र त्याच कोल्डकॉफीमध्ये आरोपी तरुणीने गुंगीचे औषध मिसळले होते. गुंगीचे औषध मिसळेली कॉफी प्यायल्यामुळे फिर्यादी तरूणी बेशुद्ध पडली. याचाच फायदा मैत्रिणीनं घेतला आणि थेट बेडरूम मध्ये जाऊन कपाटाचे ड्रॉव्हर मधील ५ लाख ४६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून तिने तिथून पळ काढला. थोड्या वेळाने फिर्यादी तरूणीला शुद्ध आली आणि घरात चोरी झाल्याचे तिच्या लक्षात आलं. तिने तिच्या मैत्रिणीला खडसावून विचारले असता, आपणच तिच्या घरात चोरी केल्याची कबुली ऐश्वर्याने दिली. आणि लवकरच दागिने परत करते असे आश्वासन दिले. मात्र वारंवार विचारून सुद्धा मैत्रिणीने दागिने परत न दिल्यामुळे तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी कसून तपास करत ऐश्वर्याला अटक केली असून आणखी तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon