तेजस्वी घोसाळकर आणि प्रमुख साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या घटनेनंतर वर्षभराने आता तेजस्वी घोसाळकर यांना व्हाट्सअपवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकी प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. तेजस्वी घोसाळकर यांना एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावरुन तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेले लालचंद पाल यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआयकडून सध्या सखोल तपास केला जातोय. असं असताना तेजस्वी घोसाळकर आणि या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणात काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दिवंगत अभिषेक घोसाळकर यांना फोटो टाकून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. “लालचंद पाल सुधर जा. इसकी पत्नी को मत मरवा देना”, असा मेसेज फोटोसोबत होता. एका व्हाट्सअप ग्रुपवर हा मेसेज होता. ‘गरीब नवाज नियाज कमिटी’ या व्हाट्सअप ग्रुपवर ही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये हत्या करण्यात आली होती. मॉरिस नरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांना कार्यक्रमासाठी आपल्या कार्यालयात बोलावले होते. अभिषेक घोसाळकर कार्यक्रमासाठी गेले तेव्हा मॉरिसने फेसबुक लाईव्ह केलं होतं. यानंतर मॉरिसने फेसबुक लाईव्ह सुरु असताना अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हल्लेखोराने त्याचवेळी स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. पण मॉरिसने स्वत:वर गोळ्या झाडल्याचं फेसबुक लाईव्हमध्ये कैद झालं नव्हतं.