प्रियकरासाठी पुन्हा एकदा एका पतीचा बळी

Spread the love

प्रियकरासाठी पुन्हा एकदा एका पतीचा बळी

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला काटा; एक क्लू सापडला अन् भयंकर घटनेचा उलगडा

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – लोणी काळभोर परिसरात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक हत्येची घटना उघडकीस आली आहे. वडाळे वस्ती येथे राहणारे रवींद्र काशिनाथ काळभोर (४५) यांची त्यांच्या घराबाहेर अंगणात पलंगावर झोपले असताना डोक्यात दगडाने आणि लाकडी दांडक्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.अवघ्या तीन तासांत लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत मयत रवींद्र यांची पत्नी शोभा रवींद्र काळभोर (४२) आणि तिचा प्रियकर गोरख त्रंबक काळभोर (४१) यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रवींद्र काळभोर हे नेहमीप्रमाणे घराबाहेर पलंगावर झोपले होते. त्याचवेळी आरोपी गोरख काळभोर याने खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांना ठार केले. सकाळी रवींद्र हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता मयत रवींद्र यांची पत्नी शोभा आणि गोरख यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्हा कबूल केला. तपासात असे निष्पन्न झाले की, शोभा आणि गोरख यांच्यातील संबंधांना रवींद्र अडथळा ठरत होते. त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा काटा काढण्याचा कट रचला आणि सोमवारी रात्री त्याच्यावर हल्ला करत त्याला संपवलं. या खुनानंतर शोभा आणि गोरख हे दोघेही काहीच घडले नाही अशा अविर्भावात वावरत होते. मात्र, पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या गुन्ह्याचा बनाव उघडकीस आणला आणि दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, उदय काळभोर, सर्जेराव बोबडे, दिगंबर सोनटक्के, पूजा माळी यांच्यासह पोलीस कर्मचारी देवीकर, शिंदे, वनवे, जोहरे, नवले, होले यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon