अपहरण करून खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक: आझाद मैदान पोलीस ठाण्याची कामगिरी
मुंबई – आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सहा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. दि. २४ मार्च २०२५ रोजी बँक ऑफ इंडिया, महात्मा गांधी रोड, फोर्ट येथे फिर्यादी विजय पांडुरंग मोरे यांच्या कंपनीत काम करणाऱ्या १७ कामगारांनी किरकोळ कारणावरून काम बंद केले. याचाच गैरफायदा घेत आरोपींनी फिर्यादीचे वडील पांडुरंग मोरे यांना जबरदस्तीने गाडीत बसवून मनसे युनियन, दादर कार्यालयात तडजोडीसाठी १० लाख रुपयांची मागणी केली. यावरून फिर्यादी विजय पांडुरंग मोरे (वय ४० वर्षे, व्यवसाय – कॉन्ट्रॅक्टर) यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपी सुजय शेखर ठोंबरे (कामगार सेना चिटणीस), सुनील सखाराम राणे, अरुण हरिश्चंद्र बोरले, अरुण धोंडीराम शिर्के, रोहित प्रवीण जाधव व मनोहर तुकाराम चव्हाण यांच्यावर सदर प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाणे गु.र.क्र. ४६/२०२५ कलम ३०८ (३), १४०(२), १२७(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५), बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी सुजय ठोंबरे यांच्याविरुद्ध साकीनाका व कुर्ला पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली लाल रंगाची महिंद्रा थार (एमएच ०१ ईआर ५५७८) हस्तगत केली आहे. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक लीलाधर पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र चांदवडे, पोलीस हवालदार राजेंद्र कटरे, राजेंद्र गायकवाड, पोलीस शिपाई लालसिंग राठोड सोमनाथ घुगे, ज्ञानेश्वर मुंडे सचिन पाटील, दीपक पवार व गोपीनाथ पाटील यांनी केली. सदर तपास व कार्यवाही पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १, प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दीपक दळवी यांनी यशस्वीपणे पार पाडली.