पालघरच्या डहाणू तालुक्यातील घोळ येथे भात गोदामाला आग, हजारो क्विंटल भात जळून खाक

Spread the love

पालघरच्या डहाणू तालुक्यातील घोळ येथे भात गोदामाला आग, हजारो क्विंटल भात जळून खाक

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – घोळ येथे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या भात गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाला गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र गोदामाला लागलेल्या या आगीत शेतकऱ्यांकडून खरेदी करून साठवण्यात आलेला भात जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोळ येथे उपप्रादेशिक व्यवस्थापक कासा यांचे आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येणारे भात साठवण्याचे भाडेतत्त्वावर घेतलेले गोदाम आहे. भात साठवण्याच्या या गोदामाला सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामात गोणपाटात भरलेले भात असल्याने काही क्षणातच आगीचा भडका उडाला व आग संपूर्ण गोदामात पसरली. स्थानिकांनी या घटनेची माहिती संबंधितांना दिल्यानंतर स्थानिक पोलीस, महामंडळाचे अधिकारी त्याचप्रमाणे अग्निशमन दलाचे बोईसर व डहाणू येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत या गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर गोदामात असलेला उर्वरित भात जेसीबीच्या सहाय्याने बाजूला सारण्यात आला.

गोदामाला लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र गोदामात साठवून ठेवलेला हजारो क्विंटल भात जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे. महामंडळाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून गोदामात साठवणूक केलेला हजारो क्विंटल भात साठा जळून लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण अद्याप अस्पष्ट असून आगीचे नेमके कारण काय? दुर्घटना कशी घडली? गोदामाला लागलेल्या आगीत नेमके नुकसान झाले याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon