आर्थिक विवंचनेतून पतीकडून पत्नी आणि मुलीची हत्या नंतर स्वत:देखील घेतला गळफास; शाळेत गेल्यामुळे एक मुलगा बचावला
योगेश पांडे / वार्ताहर
विरार – आर्थिक विवंचनेतून पतीने पत्नी आणि मुलीला संपवून स्वत:देखील जीवन संपवल्याची खळबळजनक घटना विरारमध्ये घडली आहे. विरार पश्चिम येथील एका इसमाने आपल्या पत्नीसह ५ वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून हत्या केली, यानंतर त्याने स्वत:देखील गळफास लावून घेतला. आर्थिक विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. विरारच्या ग्लोबल सिटी येथे उदयकुमार काजवा (५२), वीणा उदयकुमार काजवा (४२) आणि शिवालिका उदयकुमार काजवा (५) यांचे मृतदेह आढळले आहेत. वीणा यांच्या पहिल्या पतीचा मुलगा वेदांत हा शाळेत गेला होता, त्यामुळे तो वाचला आहे.
वेदांत हा शाळेतून घरी आल्यावर त्याने घराचा दरवाजा वाजवला पण कुणीच दार उघडलं नाही. यानंतर त्याने आई-वडिलांना खूप कॉल केले, पण कुणीही फोन उचलला नाही, त्यामुळे आई-वडील आपल्याला एकट्याला सोडून निघून गेले, असं त्याला वाटलं. वेदांत यांने काही वेळानंतर सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना सांगितलं, यानंतर सुरक्षा रक्षकाने दरवाजा ठोठावला, मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर सोसायटीमधल्या नागरिकांनी चावी बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावलं, यानंतर दरवाजा उघडला पण आतून साखळी लावली होती. साखळी उघडल्यावर आतमध्ये उदयकुमार याने गळफास घेतल्याचे दिसले, तसंच उदयकुमारची पत्नी आणि मुलीचे मृतदेहही जमिनीवर पडल्याचं आढळून आलं. यानंतर घाबरलेल्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकाचा फोन आल्यानतंर पोलीसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हे तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आर्थिक विवंचनेतून उदयकुमार यांनी दोन हत्या करून गळफास लावल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.