हिंमत असेल तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवावा – संगीतकार विशाल दादलानी
गंगेच्या पाण्यात मोठ्याप्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (एफसी) आढळल्याची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहितीवरून बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी लोकांनी महाकुंभात पवित्र स्नान केलं आहे. पण, ज्या पाण्यात कोट्यवधी लोकांनी पवित्र स्नान केलं, त्याच पाण्यासंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नदीच्या पाण्यात मोठ्याप्रमाणात विष्ठेत असणारे जिवाणू (एफसी) आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (सीपीसीबी) दिली आहे. तब्बल १४४ वर्षांनी एकदा येणाऱ्या महाकुंभचा पवित्र मुहूर्त साधत गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तीन कोटी भाविकांनी प्रयागराजमध्ये स्नान केलंय.अशातच आता संगीतकार विशाल ददलानी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिलं आणि म्हटलं की, “योगी आदित्यनाथ यांनी कॅमेऱ्यासमोर संगमाचं पाणी पिऊन दाखवावं.”
महाकुंभाच्या त्रिवेणी संगमात पाण्यात हानिकारक जीवाणू असल्याचं वृत्त समोर आलं त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ते नाकारलं. आता त्याच बातमीचा स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत विशाल ददलानीनं लिहिलंय की, “सर, द्वेष करणाऱ्यांची काळजी करू नका. आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, कृपया कॅमेऱ्यासमोर जाऊन नदीच्या पाण्याचा एक घोट घ्या.”
विशाल ददलानी यांनी अहवाल शेअर करत लिहिलंय की, “उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभाचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा करतात, त्यात विष्ठा मिसळल्याच्या वृत्तांना ते नाकारतात.”इतक्या प्रचंड संख्येनं लोक नदीत स्नान करत असल्यानं गंगेच्या पाण्यात एफसीचं प्रमाण वाढल्याचं संबंधित अहवालात म्हटलं आहे. उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण तेथील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सतत काम करत आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.भाविक जिथे स्नान करत आहेत, त्या सर्व ठिकाणच्या पाण्याचे नमुने १२आणि १३ जानेवारीला जमा करण्यात आले होते. त्यामध्ये फेकल कॉलिफॉर्म हे मानवी प्राण्याच्या विष्ठेत असणारे जिवाणू सापडले आहेत. संगमाच्या वरील भागातून स्नानासाठी ताजं पाणी सोडलं जातं. तरीही याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. काही भाविकांकडून नदीच्या किनाऱ्यावर कचरा आणि विष्ठा केल्याचेही प्रकार समोर आले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळेच गंगा आणि यमुना नदीच्या पाण्यात प्रदूषण होऊन जिवाणूंचे प्रमाण वाढल्याचा अंदाज आहे. महाकुंभदरम्यान शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सगळ्याची तपासणी राष्ट्रीय हरित लवादाकडून केली जात आहे.