२० वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर गजाआड – मुंबई र.अ.कि. मार्ग पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई – मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १५६/२००३, भारतीय दंड संहिता कलम ४५७, ३८० आणि ३४ अन्वये गुन्हा नोंद असलेल्या हबीबुल भोलू इमाम बक्श शेख उर्फ भुल्लू याला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिवडी येथील १३ व्या न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात हा आरोपी वारंवार गैरहजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढून त्याला ‘फरार’ घोषित केले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील बबेरू तालुक्यातील हरदोली गावात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
सदर कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) अनिल पारस्कर, तसेच परिमंडळ ४ चे पोलीस उप आयुक्त रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत र.अ.कि. मार्ग पोलीस ठाण्याच्या
मपोउपनि पल्लवी जाधव व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेतली. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांचा दबदबा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा इशारा दिला आहे.