मुंबईत लाचखोरीविरोधात मोठी कारवाई, तीन जणांना रंगेहात अटक
मुंबई – मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेंतर्गत यशस्वी सापळा रचून टंडन अर्बन सोल्युशन्सच्या तीन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या आजीच्या झोपडीचा समावेश झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत करून देण्यासाठी रुपये १,००,०००/- लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. पडताळणी दरम्यान २५,०००/- रुपये लाच घेताना आरोपींना पकडण्यात आले. त्यामध्ये विशाल रामचंद्र पांडेय (वय ३०), सर्वेक्षक, ऋषिकेश रामदास चव्हाण (वय ३५), पर्यवेक्षक, अशोक नागले (वय ३०) पर्यवेक्षक व चौथा आरोपी उमेश (पूर्ण माहिती अपूर्ण) अद्याप फरार आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७(अ), १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही शासकीय किंवा खासगी व्यक्तीने शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.