गोरेगावमध्ये अमली पदार्थ आणि पिस्तूलसह एक जेरबंद
मुंबई – गोरेगाव पश्चिम येथील अस्मि कॉम्प्लेक्समध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एका व्यक्तीकडून अमली पदार्थ आणि अवैध शस्त्र जप्त करण्यात आले आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६.४० ते १०.३० दरम्यान, ३१३ नंबरच्या खोलीत छापा टाकण्यात आला. या कारवाईत उजेर नियाज खान (वय २७) याला २३ ग्रॅम एमडी (मादक पदार्थ), ज्याची अंदाजे किंमत ४.६० लाख रुपये एवढी आहे, तसेच देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे बेकायदेशीररित्या बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे शस्त्र बाळगण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती आणि त्याने पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्याच्यावर एनडीपीएस कायदा आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.