पुण्यातील धक्कादायक घटना !
ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार; विमानतळ पोलिसांनी महिलेसह तीन्ही आरोपींना केली अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ३२ वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीय. या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुण्यातील विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडित महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. यातील तीस वर्षीय आरोपी महिलेने पीडित महिलेला आपल्या घरात डांबून ठेवले. तर इतर दोन आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.
आरोपींनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल ही केला. त्यानंतरही आरोपीने या महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही तर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेच्या घरातील देवांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात तक्रारदाखल करण्यात आल्यानंतर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.