ट्रूथ अँड डेअर खेळ खेळताना जवळीक साधत १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रीलस्टार मैत्रिणीच्या ३ मित्रांना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पिंपरी-चिंचवड परिसरातील रावेत येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ट्रूथ अँड डेअर खेळ खेळताना जवळीक साधत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. रीलस्टार मैत्रिणीच्या मित्रांनी हे कृत्य केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांना याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पीडित मुलीची नुकतीच एका रीलस्टार तरुणीशी मैत्री झाली होती. ही मैत्रिण मित्रांसोबत रावेत परिसरात पार्टीला गेली होती. त्याठिकाणी तिला पीडित मुलीचा फोन आला. त्यामुळे आरोपींनी फोनवर तिला पार्टीला येण्याचा आग्रह केला. आरोपींनी मुलीच्या रुमवर जाऊन तिला पार्टीला आणलं. एका खाजगी फ्लॅटवर या सर्वांनी मद्यधुंद अवस्थेत ट्रूथ अँड डेअर खेळ खेळत असताना रीलस्टार मैत्रिणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीवर फ्लॅटमधील स्वच्छतागृहात अत्याचार केले. हा सर्व प्रकार घडत असताना पीडित मुलीच्या नातेवाईकांना फोन लागला होता. फोन सुरू असल्याचं पीडित मुलगी आणि आरोपींच्या लक्षात आले नाही की सगळा प्रकार नातेवाईकांना फोनवर ऐकू येत आहे. नातेवाईकांनी सर्व प्रकार पीडितेच्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पहाटे पीडितेच्या आई-वडिलांनी रावेत पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीवरुन आरोपी आयुष भोईटे, सुशील ठाकूर , रीतिक सिंग यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पीडितेच्या रीलस्टार मैत्रिणीला ही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला आरोपींची नावे आणि अत्याचार झालेले ठिकाण याबाबत काहीच कल्पना नव्हती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी मोबाईल आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली. आरोपींवर रावेत पोलिसांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबतचा अधिक तपास रावेत पोलीस करत आहेत.