धुळे जिल्ह्यातल्या कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये तरुणीने गळफास घेत केली आत्महत्या; नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप
योगेश पांडे/वार्ताहर
धुळे – धुळे जिल्ह्यातील कारागृहात एका न्यायाधीन महिला बंदीवानाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. चंद्रमा बैरागी असं या २० वर्षांच्या तरुणीचं नाव आहे. महिला सेलला लागून असलेल्या बाथरूमजवळ तरुणीने गळफास लावून घेतला, ज्यात तिचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच या महिलेला एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तिला कारागृहात आणण्यात आलं होतं. तरुणीने कारागृहातच गळफास लावून घेतल्याने तिचे नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कारागृहात पोलीस संरक्षण असताना संबंधित तरुणीने गळफास कसा लावून घेतला? असा जाब तरुणीच्या नातेवाईकांनी विचारला आहे. तसंच नातेवाईकांनी तरुणीचा मृतदेह कारागृहाच्या बाहेर न्यायलाही विरोध केला आहे.
कारागृहातल्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांची समजूत काढल्यानंतर महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भाऊसाहेब हिरे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, तसंच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर मयत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.